14 जुलाई 2010

MASK2 - 8(3) - Lec2 part A

Lecture 2: 13 july 2010
काव्यशास्त्राचे निरनिराळे सिद्धान्त थोडक्यात पाहू :

अलङ्कार सिद्धान्त -
काव्यशास्त्राच्या पांच महत्त्वाच्या सिद्धान्तांपैकी अलङ्कार सिद्धान्त हा सर्वात प्रबळ ठरून काव्यशास्त्रालाच आणखी एक नाव 'अलङ्कारशास्त्र' असे पडल्याचे आपण या अधीही पाहिले । याबाबत कुमारस्वामीने असे म्हटले आहे की 'यद्यपि रसालङ्काराद्यनेकविषयमिदं शास्त्रं तथापि छत्रिन्यायेन प्राधान्यव्यपदेशादलङ्कारशास्त्रमुच्यते' ।
अलङ्कारसिद्धान्ताचा उद्गम व विकास कसा झाला ते पाहू।
अलङ्कार या शब्दाची व्युत्पत्ती अशी देता येईल :
अलम् + √कृ * घञ् = अलम् + कार = अलङ्कार ।
घञ् प्रत्ययान्त शब्दाचे दोन प्रकारचे अर्थ होतात - भावार्थक अणि करणार्थक । त्यानुसार अलङ्कार या शब्दाचे दोन अर्थ होतात :
अलङ्कार (भावार्थक) = सौन्दर्य, लावण्य, चारुता ।
अलङ्कार (करणार्थक) = सौन्दर्यनिर्मितीचे साधन ।
काव्यशास्त्रामध्ये अलङ्कार हा शब्द दोन्ही अर्थांनी वापरला जातो ।

या अलङ्कारामुळे नेमके काय होते ते पाहावे लागेल, काव्यात अलङ्काराचे स्थान काय ते तपासावे लागेल ।
काव्य म्हणजे 'शब्दार्थौ सहितौ काव्यम्', किंवा दण्डी म्हणतो तसे 'काव्यं तदिष्टार्थव्यवच्छिन्ना पदावलिः' ।
यानुसार शब्द आणि अर्थाचे साहचर्य म्हणजे काव्य अस साधा सोपा अर्थ निघतो । पण, असे साहचर्य सर्वत्र असते। म्हणजे, भूगोलाच्या पुस्तकात देखील अर्थपूर्ण शब्दांमध्ये हिमालयाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिलेली असते । मग भूगोलाच्या पुस्तकाला काव्य म्हणता येईल का ?
आणि मग कालीदासाच्या 'अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा' याला काय म्हणायचे ? आणि भूगोलाच्या पुस्तकाला काव्य म्हणता येत नाही असे जर मान्य केले, तर त्यात आणि कालिदासाच्या हिमालयवर्णनात नेमका काय फरक आहे ?
नीलकण्ठ दीक्षितर नावाचे शास्त्रज्ञ म्हणतात
" शास्त्रेषु दुर्ग्रहोऽप्यर्थः स्वदते कविसूक्तिषु । हृद्यं करगतं रत्नं दारुणं फणिमूर्धनि ॥"
(ज्याप्रमाणे नागाच्या मूर्धेतील भीषण वाटणारे रत्न देखील हातात पडल्यावर सुखदायक वाटते त्याप्रमाणे शास्त्रात दुःसह वाटणारा अर्थ कवीच्या शब्दांतून अल्यावर सुग्राह्य वाटतो)
पण याकरिता त्या शब्दांमध्ये निव्वळ वर्णनापेक्षा अधिक काहीतरी असायला पाहिजे । अन्यथा,
" गोरपत्यं बलीवर्दस्तृणान्यत्ति मुखेन सः । भोजनं देहि राजेन्द्र घृतसूपसमन्वितम् ॥ "
(गायीचा पोरगा बैल, तोंडाने गवत खातो. हे राजा, तूप अणि सार असलेले जेवण तू अम्हाला दे) या निरर्थक ओळींनाही काव्यच म्हणायची पाळी येईल ।
" गतोऽस्तमर्को भातीन्दुः यान्ति वासाय पक्षिणः । इत्येवादि किं काव्यं वार्तामेनं प्रचक्षते ॥
('सूर्य मावळला, चन्द्र चमकतोय, पक्षी घरट्याकडे परततायत' असल्या ओळींना काव्य म्हणता येत नाही, ही तर 'वार्ता' म्हे० बातमी झाली) असे भामह देखील म्हणतो । कारण यामध्ये परिस्थितीचे 'जैसे थे' वर्णन आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही। महिती / देणे हे त्याचे प्रयोजन आहे । ज्ञान देणे-घेणे हे काव्याचे प्रयोजन नाही । काव्याचे प्रयोजन आनन्दनिर्मिती हे आहे । आणि हा आनन्द कवी कसा निर्माण करतात ? तर
"यान्येव शब्दालयमालपामः । यानेव चार्थान्वयमुल्लिखामः । तैरेव विन्यासविशेषभव्यैः । संमोहयन्ते कवयः जगन्ति । ।"
नेहेमीचेच शब्द आणि अर्थ वापरून परन्तु त्यांची काही विशेष मांडणी (विन्यासविशेष) करून ते आनन्दनिर्मिती करतात। काव्यातील शब्दार्थांत अन्य शब्दार्थांपेक्षा काहीतरी विशेष असले पाहिजे ज्यामुळे ते काव्यातील शब्दार्थ वाटतील। या वैशिष्ट्यालाच अलङ्कार म्हणतात। याला 'चारुत्व', 'शोभा', 'रमणीयता', 'विच्छित्ति', 'सौन्दर्य', 'अलौकिकत्व', अशीही नावे असून वेगवेगळ्या शास्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारे हीच गोष्ट सांगितलेली आहे। उदा०
भामह : "लोकोत्तीर्णेन रूपेणावस्थानम्"। जगावेगळी मांडणी
वामन : "सौन्दर्यमलङ्कारः"।
अनन्दवर्धन : "चारुत्वमलङ्कारः"।
अभिनवगुप्त : "चारुत्वप्रतीतिः काव्यस्यात्मा"।
दण्डिन् : "काव्यशोभाकरान् धर्मानलङ्कारन् प्रचक्षते"।
अलङ्कार काव्याला शोभा आणतात आणि त्यामुळे काव्य सुन्दर होते याची जाणीव रीतसर काव्याशास्त्र मांडले जाण्याच्याही खूप आधीपासून होती । किंबहुना जेव्हापासून काव्यनिर्मिती झाली, म्हणजेच 'वैदिक-काळ' तेव्हापासूनच कवींना आपल्या काव्याला सौन्दर्य प्रदान करणाऱ्या या गोष्टीविषयी जाणीव होती। काव्यालङ्कार म्हणून तेव्हां ही सङ्कल्पना तेवढी विकसित होती किंवा नव्हती हे सांगता येत नाही पण 'अलङ्करण' म्हे० 'सुशोभीकरण' याचा वैदिक काव्यात स्पष्ट उल्लेख आढळतो ।
ऋग्वेदातील खालील ऋचा पाहा -

इमे सोमा अरङ्कृताः ।
का तेऽस्त्यरङ्कृतिः सूक्तैः ।

"शुम्भन्तो जेन्यं यथा वाजेषु विप्र वाजिनम्"

(जसे यज्ञात जातिवन्त घोड्यास साजवितात तसे, हे विप्रा, मी मझ्या काव्यास सजवीत आहे)

रथन्न धीरः स्वपा अतक्षम् ।
(जसा तक्षा लाकडातून रथ कोरून काढतो तसे मी काव्य कोरून काढतो )
"यज्ञवेदीभोवती जशा बर्हि रचल्या जाता तसे मि माझ्या काव्यात शब्दार्थ रचतो" अशी वचने वेदांमध्ये ठिकठिकाणी आढळतात ।
उषःसूक्तात "प्र रोचना रुरुचे रण्वसन्दृक्" या ऋचेत 'र' चा अनुप्रास वापरलेला आहे । अनुप्रास हा काव्यालङ्कार म्हणून तेव्हा ज्ञात नसूनही त्याचा वापार मात्र जाणीवपूर्वक केलेला दिसतो ।
ऋग्वेदासोबत 'अलङ्कार' हा शब्द अथर्ववेद, शुक्लयजुर्वेद, कठोपनिषद्, शतपथब्राह्मण, या वैदिक साहित्यात काव्यसौन्दर्य या अर्थाने वापरलेला आहे ।
यास्कांच्या निरुक्तात उपमालङ्काराचे 'कर्म, भूत, रूप, सिद्ध, व लुप्त' असे पांच प्रकार दिले आहेत ।
पाणिनीने अष्टाध्यायीत श्रौती उपमा व आर्थी उपमा असे २ प्रकार सांगितले । त्याचप्रमाणे 'उपमान, उपमित, सामान्यवचन' या संज्ञादेखील सांगितल्या । अशाप्रकारे अलङ्कारशास्त्राची बीजे वैदिक वाङ्मयात दिसतात ।
अमरकोषम्ध्ये अलङ्काराचे चार अर्थ किंवा उपयोग दिले आहेत -
भूषण - सुशोभीकरण । पर्याप्ति - पूर्तता, परिपूर्णता । शक्ति - सबलीकरण । वारण - अशुभाचे निवारण ।
यांपैकी काव्यात फक्त पहिले दोन वापरले जातात ।

MASK2 - 8(3) - Lec2 part B पाहा

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें