21 July 2010 - 1100am - Dr. Gauri Mahulikar
वैदिक देवता वरुण
वरुण या वैदिक देवतेचे स्वरूप -
वरुण ही वेदांतील सार्वभौम देवता आहे । आदित्य म्हे० अदितीचे आठ पुत्र – वरुण, मित्र, अर्यमन्, भग, अंश, दक्ष, इन्द्र व मार्तण्ड – यांपैकी वरुण हा प्रमुख आहे । ऋग्वेदामध्ये वरुणाची एकूण ४६ सूक्ते असून इन्द्राची त्याहून जास्त म्हे० २८९ असली, तरीही वरुणाच्या श्रेष्ठतेला बाधा येत नाही इतके त्याचे स्थान अढळ आहे ।
वरुण ही आकाश, जल, क्षीरसागर आणि पातळलोक यांची देवता आहे । ‘सोन्याचे चिलखत नेसलेला, हातात सर्पाचा पाश धरलेला आणि मकरावर आरूढ झालेला’ असे त्याचे वर्णन आढळते ।
वरुण या वैदिक देवतेचे कार्य -
वरुण ही ‘ऋत’ म्हे० न्यायाचीही देवता आहे । वरुण सर्वव्यापी आहे आणि त्याच्या अधिपत्याखालीच ही सृष्टी आहे । वरुणाने स्थापिलेले ‘व्रत’ म्हे० ‘न्यायव्यवस्था’ सर्व प्राणिमात्रांवर बन्धनकारक आहे । आकाशातील तारे हे, आकाशाची देवता असलेल्या वरुणाचे सहस्रावधि हेर असून त्यांद्वारे तो योग्यायोग्य वर्तन करणाऱ्या भूतमात्रांवर लक्ष ठेवून असतो । आपल्या व्रताचे उल्लंघन करणाऱ्याभोवती वरुण आपला पाश आवळतो आणि त्यास शासन करतो । अशाप्रकारे वरुण न्यायाचा म्हे० धर्माचा रक्षक आहे ।
जाणून बुजून केलेल्या पापास वरुण शासन करतो, पण अजाणतेपणी झालेल्या प्रमादास क्षमाही करतो म्हणजेच वरुण हा स्वभावतः न्यायवृत्तीचा आहे । त्यामुळेच ऋग्वेदीय नित्यकर्मांतील सायंसन्ध्येमध्ये दिवसभरात अजाणतेपणी झालेल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी वरुणसूक्ताचे पठन करून वरुणास अर्घ्य देण्याचा विधि आहे ।
असुरवरुण -
वरुणाचे आणखी एक व्यवच्छेदक विशेषण म्हे० ‘असुर-वरुण’ । ‘असुर’ या शब्दाकडे जरा खोलपणे पाहू:
या शब्दाची फोड असु-र अशी आहे । असु=प्राण । ‘र’ च्या अनेक व्युत्पत्ती करता येतील ।
(1) मत्वर्थक ‘र’, त्यानुसार असुर = प्राणवत् , प्राणयुक्त ।
(2) √रा (दाने, 2पप) या धातुचे ‘र’ हे उपपद मानल्यास, ‘असून् राति इति असुरः’ (लोकांस प्राण देणारा, तो, असुर) असाही अर्थ होतो ।
दोन्ही अर्थंनी वरुणाचा सम्बन्ध प्राणाशी किंवा जीवनाशी आहे । त्यानुसार वरुण हा वायुशीही सम्बद्ध आहेसे मानता येईल ।
मित्रावरुण
ऋग्वेदात बहुतवेळा 'मित्रावरुण' अशी जोडदेवता आढळते । मित्र आणि वरुण यांची वेगवेगळ्या प्रतीकांशी तुलना केली जाते ।
मित्र = अग्नी, उष्णता, तेज, सूर्य, दिवस, प्रकाश, शुक्लपक्ष, इ० ।
वरुण = जल, शैत्य, बाष्प, चन्द्र, रात्रि, अन्धकार, वद्यपक्ष, इ० ।
कोणत्याही पदार्थाच्या निर्मितीसाठी उष्णता आणि बाष्प आवश्यक असतात । म्हू० मित्रावरुण या देवतेस सर्व निर्मितीचे आद्यस्रोत मानले जाते । पैकी, मित्र हे पुरुषाचे आणि वरुण हे स्त्रीचे प्रतीक आहे । त्यामुळे मित्रावरुण ही एक वैदिक अर्धनारीश्वर देवता आहेसे म्हणता येईल । पौराणिक शिवपार्वतीरूपी अर्धनारीश्वर देवतेचा उगम मित्रावरुण या वैदिक देवतेमध्ये आहे असे मानण्यास वाव आहे ।
आधुनिक तत्त्वज्ञ योगी ओरोबिन्दो यांच्या मते, मित्र हे प्रकाशाचे तर वरुण हे शक्तीचे प्रतीक आहे । शक्ति आणि प्रकाशाच्या संयोगाने मनुष्यांस जगण्याची ऊर्जा प्राप्त होते ।
वरुणाचा अन्य प्राचीन संस्कृतीतील देवतांशी सम्बन्ध –
वरुण आणि युरानस् (Uranus)
वैदिक देवता वरुण आणि ग्रीक देवता युरानस् (Uranus) यांच्या नावांतील भाषाशास्त्रीय साम्य लक्षात घेऊन या दोन्ही देवता एकच आहेत असे प्रतिपादन ज्यॉर्जेस् द्युमेझील (Georges Dumezil), रॉबर्ट् ग्रेव्ज् (Robert Graves) इ० तज्ञांनी केले आहे । त्यांच्या मते, प्रोतो-इन्दो-युरोपीय भाषेतील √उएर् (√uer = बांधणे) धातुपसून वरुण आणि युरानस् हे शब्द उत्पन्न झालेत । वरुण पाप करणाऱ्यांस आपल्या पाशाने बांधतो आणि युरानस् देखील सायक्लोप नावाच्या रक्षसांस आपल्या पाशाने बांधतो । शिवाय ग्रीक भाषेत Ouranos म्हणजे आकाश । युरानस् आणि वरुण, दोन्ही आकाशाच्या देवता मानल्या जातात ।
अन्य काही तज्ञांच्या मते वरुण आणि युरानस् या शब्दांची उत्पत्ती प्रोतो-इन्दो-युरोपीय भाषेतील √वेर्स् (√wers=भिजवणे, पाणी शिम्पडणे; संस्कृत:√वर्ष् ) या धातुपासून झालेली आहे । वरुण वा युरानस् या दोहोंना जलाची वा पावसाची देवता देखील मनतात ।
वरुण आणि अहुर-मज़्दा
ऋग्वेद आणि पार्शी झेन्द अवेस्ता या ग्रन्थांतील लक्षणीय साम्य ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही । या भाषांतील ‘स’ आणि ‘ह’ ही अक्षरे परस्परवैकल्पिक आहेत ।
यावरून ‘असुर’ या शब्दाचा ‘अहुर’ या शब्दाशी सम्बन्ध दाखवता येतो । याद्वारे कुइपर (Kuiper) इ० तज्ञ असे प्रतिपादन करतात की, वैदिक वरुण (वरुण-मित्र) आणि अवेस्त अहुर-मज़्दा ही एकाच देवतेची वेगवेगळ्या संस्कृतीतील नावे आहेत । विशेष म्हे० अवेस्ता गाथेनुसार अहुर-मज़्दा ही सार्वभौम देवता असून ती सत्याचे म्हे० धर्माचे रक्षण करणारी आहे । वेदांमध्येही वरुणाचे स्थान तेच आहे ।
वरुण आणि अशुर
वैदिक काळाशी समान्तर असलेल्या असिरीय (पुरातन ज्यू ) संस्कृतीतही ‘अशुर’ नावाच्या देवतेचा उल्लेख आहे । तिग्रिस् नदीच्या किनारी याने एक नगर वसवले । नन्तर त्या नगराचे नावच अशुर असे झाले । आधुनिक ‘असिरिया’ हा शब्द अशुर शब्दाचेच परिवर्तित रूप म्हणता येईल । अशुर देवतेचेही ‘असुर’वरुणाशी साम्य असल्याचे काही तज्ञ मानतात ।