08 अगस्त 2010

mask2 - 4(1) - waruna-suukta

(व्याकरणात पाणिनीय पद्धतीच्या संज्ञा वापरलेल्य आहेत । उदा० प्रथम पुरुष Third Person, मध्यम पुरुष Second Person, उत्तम पुरुष First Person. लट् = वर्तमानकाळ ; लिट् = परोक्ष भूत ; लृट् = द्वितीय भविष्य ; लङ् = अनद्यतन भूत ।
ही खूण धातु ची असून धातु देखील पाणिनीय धातुपाठानुसार आहेत, म्हे० हेड् च्या ऐवजी हेडृ)

वरुणसूक्त

ऋग्वेदमण्डल 1 - अनुवाक 6 - सूक्त 25

ऋषि - शुनःशेप छन्द - गायत्री । देवता - वरुण ।

ऋग्वेदीय नित्यकर्मांतील सायंसन्ध्येमध्ये, दिवसभरात अजाणतेपणी झालेल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी वरुणसूक्ताचे पठन करून वरुणास अर्घ्य देण्याचा विधि आहे । मूळ सूक्त 21 ऋचांचे असून सन्ध्येमध्ये साधारणपणे फक्त 10 ऋचा पठिल्या जातात ।

यच्चि॒द्धि ते॒ विशो॑ था॒ दे॑व वरुण व्र॒तम् । मि॒नी॒मसि॒ द्यवि॑द्यवि ॥1 (संहितापाठ)

यत् । चि॒त् । हि । ते॒ । विशः॑ । य॒था॒ । प्र । दे॒व॒ । व॒रु॒ण॒ । व्र॒तम् । म॒नी॒मसि॑ । द्यवि॑ऽद्यवि 1(पदपाठ)

देव वरुण, यथा विशः, ते व्रतम् द्यविद्यवि यत् चित् हि मिनीमसि । देव वरुण, यथा (ते) विशः, (तथा एव वयम् अपि) ते व्रतं द्यवि द्यवि यत् चित् हि मिनीमसि ।

भाषान्तर - हे वरुण देवा, ज्या प्रमाणे (तुझे) प्रजाजन (प्रमादशील आहेत त्याच प्रमाणे आम्ही देखील) दररोज तुझ्या व्रतात जो काही (थोडासा) प्रमाद (नकळत) करतो ।

टिपा - खरे पाहाता, मूळ ऋचेचा अर्थ इतकाच आहे आणि त्यामुळे सायणाचार्य यावर भाष्य करताना ऋचेस पूर्णत्व देण्यासाठी यात आणखी थोडीशी इष्टपदपूर्ति करतात ती अशी- ‘तदपि व्रतं प्रमादपरिहारेण साङ्गं कुरु इति शेषः। म्हे० प्रमादाचा परिहार करून तू ते देखील (प्रमादयुक्त) व्रत परिपूर्ण कर (गोड मानून घे)

वेलणकर शास्त्री मात्र, ही इतकी इष्टपदपूर्ति करता, या ऋचेचा पुढील ऋचेशी अन्वय जोडतात आणि अर्थ पूर्ण करतात ।

मीञ् (हिंसायाम् , क्र्यादिगण) (बांधणे, मारून टाकणे) - लट् उत्तमपुरुष बहुवचनमिनीमस् = मिनीमः ।

वेदांत छन्दःपूर्ति करिता मिनीमस् या रूपास जोडूनमिनीमसि हे रूप तयार झाले




मा नो॑ व॒धाय॑ ह॒त्नवे॑ जिहीळा॒नस्य॑ रीरधः । मा हृ॑णा॒नस्य॑ म॒न्यवे॑ ॥2

मा । नः॒ । व॒धाय॑ । ह॒त्नवे॑ । जि॒ही॒ळा॒नस्य॑ । री॒र॒धः॒ । मा । हृ॒णा॒नस्य॑ । म॒न्यवे॑ ॥2

जिहीळानस्य हत्नवे वधाय हृणानस्य मन्यवे नः मा मा रीरधः । जिहीळानस्य (तव) हत्नवे वधाय () हृणानस्य (तव) मन्यवे () नः मा मा रीरधः ।

भाषान्तर - आमचा अनादर करणाऱ्या तुझ्या संहारक शस्त्राकडे वधासाठी तू आम्हास सोपवू नकोस तसेच संतापलेल्या तुझ्या क्रोधास तू आम्हास पात्र करू नकोस ।

टिपा - वेलणकर शास्त्री यांनी पहिल्या आणि या ऋचेचा एकत्रित अर्थ घेतलाय तो असा – ‘हे वरुण देवा, ज्या प्रकारे तुझे इतर प्रजाजन, त्या प्रमाणेच आम्ही, दररोज अजाणतेपणी तुझ्या व्रतात काही चूक करीत असतो, त्या चुकीमुळे आमचा अनादर करणाऱ्या तुझ्या शस्त्राकडे तू आम्हास वधाकरिता सोपवू नको, किंवा संतापलेल्या अशा तुझ्या क्रोधास आम्हास पात्र करू नको । म्हे० तू कारुण्यपूर्वक आम्हास क्षमा कर ।

हेडृ (अनादरे, भ्वादिगण) (अनादर करणे, हेटाळणे) - लिट् कानच् पुंलिङ्गी षष्ठी एकवचन ।

लिट् असल्यामुळे ह् ला ज् चा अभ्यास झाला (जेहेड्) । कानच् प्रत्यय लागून जेहेडान बनले । वैदिक व्याकरणामुळे -काराचा -कार होऊन जिहिडान ड् चा ळ् होऊन जिहिळान असे रूप सिद्ध झाले । त्याचे पुंलिङ्गी षष्ठी एकवचन - जिहिळानस्य ।

हन (हिंसायाम् , अदादिगण) - हन् * क्नु प्रत्यय लागून हत्नु शब्द सिद्ध झाला । त्याचे पुंलिङ्गी चतुर्थी एकवचनहत्नवे ।

राध (संसिद्धौ, स्वादिगण) (सिद्ध करणे) - लुङ् मध्यमपुरुष एकवचन - अरीरधः। मा अरीरधः असा मूळ प्रयोग परन्तु मा निपाताशी संयोग झाल्यामुळे या अगमाचा लोप होऊन मा रीरधः असा प्रयोग सिद्ध झाला ।

हृणीङ् (रोषणे, कण्ड्वादिगण) (रागावणे) हृण् * शानच् - हृणान। पुंलिङ्गी षष्ठी एकवचन हृणानस्य ।

मन (ज्ञाने, दिवादिगण) (जाणणे) मन् * युच् = मन्यु । पुंलिङ्गी चतुर्थी एकवचन - मन्यवे




वि मृ॑ळी॒काय॑ ते॒ मनो॑ र॒थीरश्वं॒ संदि॑तम्। गी॒र्भिर्व॑रुण सीमहि ॥3

वि । मृ॒ळी॒काय॑ । ते॒ । मन॑ र॒थीः । अश्व॑म् । न । सम्ऽदि॑तम् । गीः॒ऽभिः । व॒रु॒ण॒ । सी॒म॒हि॒ ॥3

संदितम् अश्वं रथीः न वरुण मृळीकाय ते मनः गीर्भिः वि सीमहि । (यथा) संदितम् अश्वं रथीः (तथा), (हे) वरुण, (वयम् अस्माकं) मृळीकाय ते मनः गीर्भिः वि सीमहि ।

भाषान्तर सायण - जसे श्रमाने थकलेल्या घोड्यास रथाचा स्वामी (चारा खायला घालून प्रसन्न करतो) तसे आम्ही आमच्या सुखाकरिता तुझ्या मनास आमच्या प्रसादयुक्त वाणीशी जोडून प्रसन्न करितो ।

टिपा - सायणांनी विसीमहि चा अर्थ विशेषेण सीमहि म्हे० चांगल्या प्रकारे शिवतो/एकत्र करतो असा घेतला ।

वेलणकर - जसे श्रमाने थकलेल्या घोड्यास रथाचा स्वामी रथापासून वेगळे करतो, तसे आम्ही आमच्या वाणीद्वारे म्हे० या सूक्ताद्वारे, सुखाकरिता तुझ्या मनास व्रतातील प्रमादातून निर्माण झालेल्या असन्तोषापासून वेगळे करितो । वेलणकर शास्त्रींनी वि उपसर्गाचा अर्थ वियुज्विभज् याप्रमाणे मूळ धातुच्या विरोधात्मक घेतला । त्यामुळे, ‘विसीमहि म्हणजे वेगळे करतो ।

मृड (सुखने, तुदादिगण) (सुखी होणे) कृदन्त रूप = मृळीक = सुख ।

दो (अवखण्डने, दिवादिगण) (अलग करणे) सम्दो*क्त (कर्मणि भूत० धातुसाधित) = सन्दित । पुंलिङ्गी द्वितीया एकवचन = सन्दितम् ।

षिवु (तन्तुसन्ताने, दिवादिगण) (धाग्याने शिवणे) वि षिवु - विधिलिङ् उत्तम पुरुष बहुवचन = वि सीमहि



परा॒ हि मे॒ विम॑न्यवः॒ पत॑न्ति॒ वस्य॑इष्टये । वयो॒ व॑स॒तीरुप॑ ॥4

परा॑ । हि । मे॒ । विऽम॑न्यवः । पत॑न्ति । वस्य॑ऽइष्टये । वय॑ न । व॒स॒तीः । उप॑ ॥4

वयः वसतीः उप पतन्ति मे विमन्यवः वस्यःइष्टये हि परा पतन्ति । (यथा) वयः वसतीः उप पतन्ति (तथा) मे विमन्यवः वस्यःइष्टये हि परा पतन्ति ।

भाषान्तर- ज्या प्रमाणे पक्षी आपल्या घरट्यांकडे परत येतात त्याप्रमाणे माझे क्रोधरहित विचार सुखाच्या इच्छेने भरारी घेतात ।

वस्यस् = सौभाग्य = सुख ।